सायकल आणि चप्पल वाटणे खासदाराचे काम नव्हे : विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:58 PM2019-03-14T13:58:55+5:302019-03-14T14:03:39+5:30
सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे ही खासदाराची कामे नाहीत अशा शब्दात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. -
पुणे : सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे ही खासदाराची कामे नाहीत अशा शब्दात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
पुण्यातील हॉटेल वैशाली येथील कट्ट्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुप्रिया सुळे करतात त्या स्वरूपाची कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्या आहेत.मागील निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यांमधून मताधिक्य मिळाल्याने विजयी झाल्या आहेत. इतर तालुक्यात फार कमी मते मिळाली असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
पुढे ते म्हणाले की,
- सध्या मावळ मधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारी बाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तुत्व आहे. ते केवळ नेत्याची मुले आहेत. म्हणून त्यांना उमेदवार देणार का?
- या दोघांनी किमान दहा वर्ष समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवाराचा विचार पक्षांनी करायला हवा होता.
- शरद पवार यांना वार्याची दिशा समजल्याने माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली. तसेच शरद पवार यांचे कार्य खूप मोठे आहे.
- पण मागील निवडणुकीतील माढामधील कामाबाबत तेथील जनतेमध्ये शरद पवार यांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे.