राज्यात जो मोठा, त्याच्याकडेच नेतृत्व, हेच महाआघाडीचे सूत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:39 AM2019-01-25T03:39:17+5:302019-01-25T03:39:31+5:30
राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या प्रभावानुसार त्या-त्या ठिकाणी भाजपाविरोधी महाआघाडीचे नेतृत्व ठरेल.
- राजा माने
मुंबई : राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या प्रभावानुसार त्या-त्या ठिकाणी भाजपाविरोधी महाआघाडीचे नेतृत्व ठरेल. पश्चित बंगालमध्ये ममता बॅनर्जी, केरळमध्ये डीएमके, आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी आणि हरियाणा व पंजाबमध्ये काँग्रेसकडे नेतृत्व असेल, असे राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलखतीत सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना खा. पवार यांनी सध्याच्या राजकीय परस्थितीवर सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, २०१४ साली नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला स्वप्न दाखवून सत्ता संपादन केली; मात्र गेल्या साडेचार वर्षात जनतेचा स्वप्नभंग झाला आहे. शिवाय, त्यावेळी राहुल गांधी अगदीच नवखे होते. आता ते अधिक आक्रमक झाले असून राहुल यांची प्रतिमा पूर्णत: बदलली आहे. ते २०१४ चे राहुल गांधी राहिलेले नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, औरंगाबाद, अहमदनगर, माढा, रावेर, उस्मानाबाद व जळगाव या लोकसभा मतदारसंघाचा निर्णय बाकी आहे. या जागांचा तिढा येत्या आठवडाभरात सुटेल, असे खा. पवार यांनी सांगितले.
> वजन घटविण्याचा ‘शरद पवार फंडा’!
मागच्या सहा महिन्यात शरद पवार यांनी आपले चौदा किलो वजन घटविले आहे. कसे घटविले त्यांनी आपले वजन? दीक्षित फंडा नव्हे... इथेही शरद पवार फंडाच! कॅन्सरसारख्या राक्षसाला आपल्यापुढे गुडघे टेकायला लावणारे पवार तसे ‘हाडाचे खवय्ये’ ! त्यात नॉन व्हेज हा तर त्यांच्या आवडीचा विषय. पण सहा महिन्यांपूर्वी त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. मनाचा ठाम निग्रह हे तर त्यांचे बलस्थानच. मग काय, त्यांनी आपला आवडीचा आणि जिव्हाळ्याचा नॉनव्हेज खाण्याचा विषय त्यांनी चुटकी सरशी बासनात गुंडाळला अन चक्क नॉनव्हेज सोडले! अर्थात वैद्यकीय कारणाने त्यांना मासे मात्र खावे लागतात. जेवणात केवळ एकच पोळी खाण्याचा नियमही त्यांनी केला. अशा आहाराला त्यांनी संधी मिळेल तेव्हा चालण्याची जोडही दिली. अवघ्या सहा महिन्यात त्यांचे १४ किलो वजन घटले.