शिवसेना भवन परिसरात जोरदार राडा; राम मंदिर जमीन गैरव्यवहारावरून शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:49 AM2021-06-17T06:49:12+5:302021-06-17T06:51:21+5:30
shiv sena-BJP clash: राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठीच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून बुधवारी शिवसेना (shiv sena) भवन परिसरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी आंदोलक भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली. काही छायाचित्रकारांवरही हल्ला झाला. नंतरही काही काळ या भागात तणावाचे वातावरण होते. (BJP -shivsena workers clash in front of shiv sena bhavan mumbai.)
राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले. शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी शिवसेना भवनापासून साधारण अर्धा किलोमीटरवरच या आंदोलकांना अडवले. त्यानंतर युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेले.
भाजपच्या आंदोलनाची कुणकूण लागल्याने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सेना भवन परिसरात गर्दी केली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. मात्र, काही वेळातच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांची बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. महिला कार्यकर्त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण झाल्याने वातावरण तापले. यावेळी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यातूनच गर्दी वाढून पुन्हा भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांत वाद वाढला. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.
‘शिवसेना आता खिल्जीसेना`
भाजपच्या माहीम विधानसभेच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांच्यासह विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांना मारहाण झाली. शिवसेनेच्या राकेश देशमुख, चंदू झगडे, संदीप देवळेकर या स्थानिक कार्यकर्त्यांसह मिलिंद वैद्य, राजू पाटणकर, श्रद्धा जाधव यांच्यावर कारवाईची मागणी तेंडुलकर यांनी केली आहे.
एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर गुंडा सेना आहे. आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी आंदोलन केले. आम्ही गाडीने जात होतो तेवढ्यात शिवसेनेचे लोक आम्हाला मारायला लागले. आम्हीही दादरकर आहोत. दादर यांच्या बापाचे आहे का?, शिवसेना आता खिल्जीसेना बनली आहे. यांना हिंदुत्वाचं काही पडलेले नाही, असा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला.
`अंगावर याल, तर शिंगावर घेऊ`
शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि तेथे कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून तसेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. ही केवळ एक प्रतिक्रिया आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याची काय गरज आहे? उगाचच कळ काढली,
तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, हे लक्षात ठेवा. आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेऊ.
- किशोरी पेडणेकर, महापौर
दोन गुन्हे दाखल
मारहाणीप्रकरणी शिवाजी
पार्क पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जमावबंदीचा
नियम मोडून मोर्चा काढल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सात शिवसैनिकांविरोधात मारहाण, विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू जगडे, राकेश देशमुख, शशी पुडने यांचा समावेश आहे.
शिवसेनेला लाथांनीच उत्तर - आशिष शेलार
भाजप युवा मोर्चाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केले होते. मात्र, शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेतून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा देव होतात, त्यावेळी साठे, तेंडुलकर, आंबेकर हे आपोआपच शिवसेनेला शत्रू वाटू लागतात.
लातों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे शिवसेनेला लाथांनीच उत्तर मिळेल. पोलिसांनी नि:पक्षपणे काम करावे, अशी आमची अपेक्षा आहे. पण, राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे, हे कळायला मार्ग नाही, असा टोला त्यांनी लगावला.