SRPF जवानांसाठी मोठी बातमी! बदलीसाठी १५ वर्षाची अट रद्द; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:37 PM2021-05-12T16:37:45+5:302021-05-12T16:38:49+5:30
या निर्णयासाठी आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या विनंतीवरून SRPF जवानांच्या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती.
मुंबई – राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत SRPF जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची १५ वर्षाची अट रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
यापूर्वी SRPF जवानांच्या बदलीसाठी १५ वर्षाची अट होती. ती आता १२ वर्ष करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षावरून आता २ वर्षावर करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी SRPF जवानांसाठी घेतलेल्या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
या निर्णयासाठी आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या विनंतीवरून SRPF जवानांच्या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीवरून आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यानिर्णयामुळे SRPF जवानांची दिर्घकालीन मागणी पूर्ण झाली असून कर्तव्य बजावण्याबरोबरच एसआरपीएफ जवानांची सोय होणार आहे असं मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
काय होती मागणी?
एसआरपीएफ दल हे राज्यात सातत्याने कार्यरत आहेत. नियमित पोलीस जवानांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या दलातील जवान नेहमीच आघाडीवर असतात. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या नियमांत पूर्वी दहा वर्षांच्या कार्यकालाची मर्यादा होती. मात्र, मागील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी नियमांत बदल करून हा कार्यकाळ पंधरा वर्षांचा केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर एसआरपीएफ दलातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन बदल्यांची कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सातत्याने होत होती.
"मुख्यमंत्री साहेब, आदित्य ठाकरे साहेब माझा जीव तुम्ही घेतला तरी चालेल..”
राज्य राखीव पोलीस बलाची जिल्हा बदली १५ वर्षा ऐवजी १० वर्ष करावी यासाठी २० दिवस समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी घरातच उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनाची सुरुवात मार्च २०१९ पासून केली असून या आंदोलनासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयाबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी मुंडन आंदोलन देखील केलं होते. अश्विनी केंद्रे या किडनी विकाराने ग्रस्त असून आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचं सांगितले होतं. जर माझ्या जीवितास काही झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असतील असे आंदोलन कर्त्या अश्विनी केंद्रे यांनी म्हटलं होतं.