मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडी; संजय राऊत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 10:30 AM2021-01-15T10:30:52+5:302021-01-15T10:31:37+5:30
Sanjay Raut, Sharad pawar meeting : मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांबाबत आज महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे, धनंजय मुंडे यांच्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खूप मोठा ठरण्याची शक्यता आहे. संजय राऊत सकाळी सकाळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.
थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे आणखी एक भाजपातून डेरेदाखल झालेले नेते एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी गेल्या महिनाभरापासून प्रलंबित आहे. कोरोना क्वारंटाईनमुळे खडसेंनी १४ दिवसांचा अवधी वाढवून मागितला होता. तो आज संपला असून ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
दुसरीकडे या दोन घडामोडींमुळे शरद पवार व्यस्त असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सपत्नीक शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक गाठल्याने चर्चेला उधान आले आहे. संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीने नोटीस पाठविली आहे. प्रवीण राऊत यांच्याकडून राऊत यांच्या पत्नीने घर घेण्यासाठी 50 लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे त्यांनी परत दिल्याची माहिती ईडीला दिली आहे. यावरूनही भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला असून पैसे परत दिले तरी ईडीला हिशेब द्यावा लागणार असे म्हटले आहे.
धनंजय मुंडेवर राऊतांची भूमिका काय...
पोलिसांनी बलात्काराची तक्रार दाखल करून घेतली नाही यावर मी काहीही बोलू शकत नाही. हा राजकीय विषय नाही. राजकीय विषयावर आरोप प्रत्यारोप ठीक आहेत. हा कौटुंबीक विषय आहे. एखाद्यावर वैयक्तीक टीका केल्यास त्याचे आयुष्य, कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. यामुळे राजकीय नेत्यांनी एकामेकांवर असले आरोप करू नयेत. धनंजय मुंडेंवरच हा प्रश्न सोडला पाहिजे. कारण तो त्यांचा व्यक्तीगत, कौटुंबीक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेण्यासाठी प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावा काय नाही याचा त्यांना जास्त अनुभव आहे, असे सुतोवाच शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.