भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:50 PM2024-10-17T23:50:48+5:302024-10-17T23:55:28+5:30

Rajan teli Uddhav Thackeray Shiv Sena: भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले तेली शिवसेनेत घरवापसी करणार आहेत. 

big setback to bjp in konkan, former mla rajan teli joining uddhav thackeray shiv sena | भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?

भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?

Rajan Teli Latest News: नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेला रामराम केलेल्या राजन तेली यांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राजन तेली शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. राजन तेलींनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर यांची चिंता वाढणार आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राजन तेली यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दीपक केसरकर यांना लक्ष्य करत असलेल्या राजन तेली यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. राजन तेली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असणार आहे. 

"...तर दीपक केसरकरांचा पत्ता कट झाला असता"

काही दिवसांपूर्वीच राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. "२०१४ मध्ये मी माझा भाजपासाठी बळी दिला. २०१९ मध्ये एबी फॉर्म काढून टाकण्यात आला. पक्षाने एबी फॉर्म दिला असता, तर त्याचवेळी दीपक केसरकरांचा पत्ता कट झाला असता. आम्ही किती अन्याय सहन करायचा?", असे तेली म्हणाले होते.

२०१९ मध्ये अपक्ष लढवली होती विधानसभा निवडणूक

२००९ मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी राजन तेली यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती. केसरकर यांना ७०९०२ मते, तर राजन तेली यांना २९७१० मते मिळाली होती. 

पुढे २०१९ मध्ये भाजपा शिवसेना युती झाली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकरांनी पुन्हा निवडणूक लढवली. राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत केसरकर यांना ६९७८४ मते मिळाली होती, तर राजन तेली यांना ५६५५६ मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी ठाकरेंकडून उमेदवारी मिळाल्यास केसरकरांसमोर कडवे आव्हान असेल. 

Web Title: big setback to bjp in konkan, former mla rajan teli joining uddhav thackeray shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.