मनसेला मोठा धक्का! मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:32 PM2021-07-16T19:32:33+5:302021-07-16T19:45:39+5:30
काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं.
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर(MNS Aditya Shirodkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.
काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. यात एक मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश करण्यात आला होता. यात मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
आदित्य शिरोडकर जी यांचे शिवसेना परिवारात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! https://t.co/bya8GN2G0C
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2021
आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात झाला होता वाद
मागील वर्षी २३ जानेवारीला मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण आणि पक्षाचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं होतं. त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मनसेने मुंबईतील राजगड कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं. बाळा नांदगावकरांच्या या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.