१४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये पडणार मोठी फूट, भाजपाच्या बड्या नेत्याचे भाकीत
By बाळकृष्ण परब | Published: January 11, 2021 08:43 PM2021-01-11T20:43:03+5:302021-01-11T20:48:02+5:30
Bihar Politics News : आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे.
पाटणा - अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काठावर जय-पराजयाचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात राजकीय अस्थिरता आणि फोडाफोडीचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे. आरजेडीमध्ये मोठी फूट पडणार असून, येत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला आहे.
बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामंजस्याचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे एनडीएमधील सदस्य एका सुरात महाआघाडीवर हल्लाबोल करत आहेत.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. आरजेडीचे आमदार सातत्याने दुसऱ्या पक्षांत दाखल होत आहेत. आरजेडीच्या नेतृत्वामध्ये जर ताकद असेल तर त्यांनी या आमदारांना रोखून दाखवावे. दरम्यान, १४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये फूट पडणार आहे आणि अनेक आमदार हे एनडीएमध्ये दाखल होतील.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या विधानाला जेडीयूचे ज्येष्ठ नेते ललन सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. भूपेंद्र यादव यांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आरजेडीचे विलीनीकरण कुठल्याही पक्षात होईल, असे ललन सिंह यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वीही ललन सिंह यांनी असे विधान केले होते. जेडीयूने दारे उघडली तर आरजेडीचं अस्तित्व संपुष्टात येईल, असा दावा ललन सिंह यांनी त्यावेळी केला होता.
आता आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी भूपेंद्र यादव यांच्या विधानावर टीका केली आहे. आरजेडीच्या आमदारांना फोडण्याएवढी पात्रता भाजपामध्ये नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारांना फोडून दाखवावं, असे आव्हानही दिले आहे. एनडीएमध्ये सुरू असलेल्या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून असा दावा करण्यात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. त्यानंतर भाजपानेही शिवानंद तिवारी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज नाही तर उद्या आरजेडीमध्ये फूट पडणार आणि हा पक्ष संपुष्टात येणार हे निश्चित आहे, असे भाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटले आहे.