‘’मी मोदींचा हनुमान, गरज पडल्याच छाती चिरून दाखवेन,’’ चिराग पासवान यांचे विधान
By बाळकृष्ण परब | Published: October 16, 2020 08:38 PM2020-10-16T20:38:03+5:302020-10-16T20:44:14+5:30
Bihar Assembly Election 2020 News : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्ती पार्टीचा उल्लेख मतं खाणारा पक्ष असा करत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मोठे विधान केले आहे.
पाटणा - केंद्रात मोदी सरकारसोबत सत्तेत असतानाही लोकजनशक्ती पार्टीने बिहारमध्ये एनडीएविरोधात भूमिका घेतल्याने बिहारमधील राजकारणात अजब परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत असलेल्या भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्ती पार्टीचा उल्लेख मतं खाणारा पक्ष असा करत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मोठे विधान केले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी मला मोदींचे फोटो वापरण्याची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. जर गरज पडली तर मी माझी छाती चिरून दाखवेन, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
प्रकाश जावडेकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चिराग पासवान म्हणाले की, माझा पक्ष २० वर्षे जुना आहे. मग माझ्या पक्षाचा विचार आणि भूमिका वेगळी का असू शकत नाहीत? भाजपाचे ज्येष्ठ नेते जे काही बोलत आहेत ते का बोलत आहेत, याची जाणीव मला आहे. लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मुख्यमंत्री त्रस्त झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मला मोदींचे फोटो वापरण्याची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. जर गरज पडली तर मी माझी छाती चिरून दाखवेन. मात्र मात्र मुख्यमंत्र्यांनी मोदींचा फोटो लावण्याची गरज आहे, कारण त्यांनी नेहमी मोदींचा विरोध आणि अपमान केला आहे, असा टोला पासवान यांनी लगावला आहे.
चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकार स्थापन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र हे सरकार भाजपा आणि लोजपाचे असावे, यामध्ये जेडीयूचा समावेश असू नये. बिहारमध्ये भाजपा आणि लोजपाचे सरकार स्थापन व्हावे, असा माझा संकल्प आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले.
बिहारमध्ये एनडीएशी असलेले नाते तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असलेल्या लोकजनशक्ती पार्टीवर आज भाजपाने जोरदार टीका केली. लोकजनशक्ती पार्टी हा केवळ मते खाणारा पक्ष आहे, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला होता. लोकजनशक्ती पार्टीचे नेते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे केवळ स्वार्थ साधण्यासाठी आणि दिशाभूल करणारे राजकारण करण्यासाठी घेत आहेत, अशी टीका केली होती.
दरम्यान, चिराग पासवान यांनी दिवंगत रामविलास पासवान यांची एक ऑडिओ क्लिप शेअर केली. या ऑडिओमध्ये रामविलास पासवान अन्याय न करण्याची आणि अन्याय सहन न करण्याची शिकवण देत आहेत.