बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित
By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 05:58 PM2020-09-29T17:58:04+5:302020-09-29T18:01:43+5:30
पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि ...
पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि देशातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सभा, प्रचार यावर अनेक निर्बंध घातले असले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी आणि दावे-प्रतिदावे जोरात सुरू आहेत. दरम्यान, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए २२० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. एनडीए बिहारमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या निवडणुकीत एनडीएला २२० जागा मिळतील, असे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.
शाहनवाझ हुसेन म्हणाले की, बिहार विधानसभेसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आहे. कोरोनाकाळात राज्य आणि केंद्र सरकारने जे काम केले आहे ते लोकांना दिसत आहे. यावेळी हुसेन यांनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलावरही जोरदार टीका केली. जे लोक रजिस्ट्रीशिवाय तिकीट देत नव्हते ते आज दहा लाख रोजगार देण्याच्या बाता मारत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोत. आम्ही पटणामध्ये एम्स बांधले. चार लाख शिक्षकांची नियुक्ती केली. नर्सिंग कॉलेज सुरू केले. आम्ही वाकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमची आघाडी चांगली आहे. एनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत. आमच्यात लवकरच जागावाटप होणार आहे.
मात्र एकीकडे शाहनवाझ हुसेन हे एनडीएमध्ये सारे काही आलबेल असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे एलजेपीचे राष्ट्रीय सरचिटणीस शाहनवाझ अहमद यांनी काही वेळापूर्वीच पक्षाकडून चिराग पासवास हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असा दावा केला आहे. तसेच एलजेपीने एनडीएसमोर ४२ जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र भाजपा-जेडीयूने त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.