Bihar Assembly Election Result : बिहार निकाल! ...अन् तेजस्वी यादवांच्या घरासमोर मासे घेऊन आले कार्यकर्ते
By हेमंत बावकर | Published: November 10, 2020 01:53 PM2020-11-10T13:53:47+5:302020-11-10T13:58:31+5:30
Bihar Election Result 2020: एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती.
बिहार विधानसभेची मतमोजणी आता अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनण्याची चिन्हे दिसू लागली असून नितिशकुमार यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सोडावे लागणार असल्याचे काही राजकीय पंडितांचा कयास आहे. अशातच सकाळपर्यंत तेजस्वी यादव यांच्या यांच्या मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न राजद समर्थक पाहत होते. ते मात्र भंगताना दिसत आहे.
मतमोजनीच्या सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या राजद महाआघाडीला मताधिक्य मिळत होते. यामुळे एक्झिट पोल आल्य़ापासून राजदच्या कार्यकर्ते जे आनंदात होते, ते काही कमी होताना दिसत नव्हते. एनडीए मागे पडल्याचे समजताच राजदचे काही हौशी कार्यकर्ते मोठमोठे मासे घेऊन थेट तेजस्वी यादवांच्या निवासस्थानासमोर हजर झाले. काही समर्थकांच्या हातात तेजस्वी यादवांचे फोटो देखील होते.
वृत्तसंस्था एएनआयने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये काही समर्थक दोन हातांवर मोठमोठे मासे घेऊन उभे आहेत. तर काही समर्थक हातामध्ये तेजस्वींचा फोटो घेऊन उभे होते.
मात्र, थोड्याच वेळात त्यांचा हा उत्साह मावळला. कारण एनडीएने आघाडी मिळवत जवळपास 130 जागांवर मताधिक्य मिळविले होते. तर राजद आघाडीला 100 जागांवर मताधिक्य दिसत होते. सध्या मतमोजणी सुरु असून 45 जागा अशा आहेत ज्यावर दोन उमेदवारांमध्ये केवळ 100 पेक्षाही कमी मतांचा फरक आहे. यामुळे बिहार निवडणुकीत चुरस वाढली आहे.
नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती.
एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती.
Patna: Supporters of RJD leader Tejashwi Yadav outside his residence as counting of votes for #BiharElection2020 is underway pic.twitter.com/VvJAlZg8uv
— ANI (@ANI) November 10, 2020
नितिशकुमार यांचे सहा मंत्री पिछाडीवर आहेत. हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-सेक्युलर (हम) चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे इमामगंज मतदारसंघातून 2000 मतांनी पिछाडीवर आहेत.