Bihar Assembly Election Results: कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभार
By कुणाल गवाणकर | Published: November 11, 2020 08:40 PM2020-11-11T20:40:15+5:302020-11-11T20:43:29+5:30
Bihar Assembly Election Results: मोदींनी सांगितलं निवडणूक विजयामागचं रहस्य; 'सायलेंट व्होटर्स'चा विशेष उल्लेख
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बिहारच्या जनतेनं जंगलराजला नाकारून विकासाला, सुशासनाच्या बाजूनं कौल दिल्याचं मोदी म्हणाले. कोरोना संकट काळातही मतदार बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं मोदींनी म्हटलं.
These days, we get headlines such as 'Rise in polling numbers of women' and 'Rise in number of votes given' is a massive change from our past: PM Modi https://t.co/JHSKIUCuywpic.twitter.com/cb5NPpAuZu
— ANI (@ANI) November 11, 2020
निवडणुकीसाठी मतदान पार पडलं की पूर्वी हिंसाचाराच्या, मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या, मतपेट्या पळवून नेल्याच्या बातम्या यायच्या. मात्र आता शांततेत मतदान झाल्याच्या, मतदान वाढल्याच्या बातम्या येतात. ही बाब अतिशय सकारात्मक असल्याचं मोदी म्हणाले. याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. बिहारच्या जनतेनं विकासाला प्राधान्य देत एनडीएच्या बाजूनं अतिशय स्पष्ट कौल दिल्याचं ते पुढे म्हणाले.
The secret to winning Bihar elections is 'Sabka saath, sabka vikas, sabka vishwaas'. It is a victory of the development works in Bihar: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/ZjpecSPjac
— ANI (@ANI) November 11, 2020
बिहार निवडणुकीत महागठबंधन बाजी मारेल, असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले होते. मात्र सर्व अंदाज चुकवत बिहारमध्ये एनडीएनं बाजी मारली. त्यातही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. त्यामागचं रहस्यदेखील मोदींनी सांगितलं. 'बिहारच्या निवडणुकीनंतर सायलेंट व्होटरची चर्चा सुरू आहे. भाजपकडे एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग सायलेंट व्होटर आहे. तो वर्ग भाजपला हक्कानं मतदान करतो,' असं मोदी म्हणाले.
महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर असल्याचं मोदींनी सांगितलं. 'भाजप सरकारमध्ये महिलांना सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. जनधनच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम गेली. उज्ज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरमुळे त्याच्या स्वयंपाकघरातला धूर दूर झाला. शौचालयांची बांधणी, वीज पुरवठा, १ रुपयात सॅनिटरी पॅड यामुळे महिलांना मोठा फायदा झाला. याच महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर आहेत. महिलांचा आशीर्वाद कायम भाजपला मिळतो. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं मोदी म्हणाले.