"जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री, जीन्स घालणारे काय राजकारण करणार?"; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:00 AM2021-08-09T11:00:32+5:302021-08-09T11:07:49+5:30
RJD State President Jagdanand Singh : राजदचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. जातीवर आधारित जनगणना सुरू करण्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी संबोधित करताना त्यांनी हे अजब विधान केलं.
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं आहे. जीन्स घालणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच जीन्स घालणारे काय राजकारण करणार? असा सवाल देखील या नेत्याने केला आहे. राजदचे (RJD) बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh) यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. जातीवर आधारित जनगणना सुरू करण्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी संबोधित करताना त्यांनी हे अजब विधान केलं.
"जीन्स घालणारे राजकारण करू शकत नाही. आमचा पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांचा पक्ष आहे. संघर्ष करणाऱ्यांचा पक्ष आहे. जे लोक जीन्स घालतात ते कधीच नेता बनू शकत नाहीत" असं जगदानंद सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच जे लोक निदर्शने करत नाहीत ते संघाचे कार्यकर्ते आहेत. ते आमच्यामध्ये घुसले आहेत, असं सांगतानाच तुम्ही चित्रपटाची शुटींग करण्यासाठी आला आहात का? राजकारण करायला आला आहात तर निदर्शनामध्ये सामील व्हा. आंदोलन करायला शिका. ही तरुण नेत्यांच्या प्रशिक्षणाची वेळ आहे, असं देखील म्हटलं आहे.
जगदानंद सिंह यांनी आपला अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यासाठी आपल्याला मोठी लढाई लढावी लागेल, असंही सांगितलं. जातीवर आधारित जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, बॅकलॉग भरावा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना इन्कम टॅक्स चौकात अडवलं. त्यानंतर जगदानंद यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. मात्र, पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन करावं यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागला.
तुम्ही लोक सतत फोटो काढण्याच्या नादात अडकलेले असतात. आंदोलनात बसा नाही तर तुम्ही आरजेडीचे कार्यकर्तेच नाही, असं आम्ही समजू अशा शब्दांत जगदानंद सिंह यांनी तरुणांना ख़डसावलं. त्यानंतर तरुण कार्यकर्ते हे आंदोलनात बसले. जगदानंद सिंह यांनी जीन्स वापरण्याबाबत केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर काही नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना निर्बंधामुळे मंदिर बंद करण्याची वेळ झाल्याचं पुजाऱ्यांनी सांगताच खासदार संतापले अन्...#BJP#Temple#crime#crimesnews#Policehttps://t.co/X8d1l4jv3t
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021