Bihar Election 2020: ...म्हणून मला नितीश यांच्या सरकारची गरज आहे; पंतप्रधान मोदींचं बिहारी जनतेला पत्र
By कुणाल गवाणकर | Published: November 5, 2020 06:46 PM2020-11-05T18:46:54+5:302020-11-05T18:47:27+5:30
Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला; ७ तारखेला मतदान; १० तारखेला निकाल
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबरला राज्यात अखेरच्या टप्प्यातलं मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला पत्र लिहिलं आहे. बिहारचा विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावा यासाठी राज्यात नितीश कुमार सरकारची आवश्यकता असल्याचं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.
राज्यात एनडीएचं सरकार आणा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी पत्राच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला केलं आहे. 'कुशासनासाठी नव्हे, सुशासनासाठी मतदान करायचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हाच आपला मंत्र आहे. बिहारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतंय आणि मला नितीश कुमार यांच्या सरकारची गरज आहे,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.
बिहार के भाइयों और बहनों के नाम मेरा पत्र... pic.twitter.com/QZ2qOlF8XD
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2020
मोदींनी बिहारी जनतेला लिहिलेल्या पत्रात भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला आहे. 'एनडीए सरकारकडे विकासाची दृष्टी आणि आराखडा आहे. उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा केवळ एनडीए सरकारच देऊ शकतं,' असा विश्वास मोदींनी बिहारच्या जनतेला दिला आहे. अराजकतेच्या वातावरणात नवनिर्माण होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. '२००५ पासून बिहारमधील वातावरण बदललं आणि नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. राज्यासाठी सामाजिक आणि आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टी एनडीए सरकारच देऊ शकतं,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.