तेजस्वी! उद्या सकाळपर्यंतच काय तो जल्लोष साजरा कर; भाजपाने दिला इशारा
By हेमंत बावकर | Published: November 9, 2020 05:31 PM2020-11-09T17:31:48+5:302020-11-09T17:33:10+5:30
Bihar Election 2020: बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
Bihar Election 2020 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. या निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपाची प्रतिष्ठा प्राणपणाला लागलेली असून लालू प्रसाद यांच्या पक्षाला झुकते माप एक्झिट पोलनी दिलेले आहे. यामुळे राजदप्रणित काँग्रेस आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण असून पटनामध्ये ठिकठिकाणी राजद समर्थकांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. यातच आज राजदचे नेते आणि लालू यांचे पूत्र तेजस्वी यादव यांचा वाढदिवस असल्याने भाजपाने हाच धागा पकडून शरसंधान साधले आहे.
बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आमदारांची फोडाफोड होण्याच्या शक्यतेने काँग्रेसने कालपासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोनिया गांधी यांचे खास सुरजेवाला आणि आणखी एक नेता पटनामध्ये तएकीकळ ठोकून आहेत.
एकीकडे राजद समर्थक उत्साहात असताना भाजपाने तेजस्वी यादव यांना उद्या सकाळपर्यंतच काय तो आनंद साजरा करण्याचा इशारा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी सोमवारी सांगितले की, 10 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंतच सारे चित्र स्पष्ट होईल. यामध्ये एनडीए बिहारमध्ये पूर्ण बहुमताने सरकार बनविणार असल्याचे दिसेल, तजस्वी यांनी उद्या सकाळपर्यंतच आनंद साजरा करावा, असे म्हटले आहे.
बिहारमध्ये तीन टप्प्यातील मतदानाने एक गोष्ट पक्की केली आहे की, जनतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याप्रती उत्साह दिसून आला. यामुळे मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएला मतदान केले आहे, असे हुसेन म्हणाले.
तेजस्वी यादव शरद पवारांना हरवणार...
बहुतांश एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्याबाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून जर असं झालं तर पुढील मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडेल. आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यांच्यासाठी ते सर्वात मोठं गिफ्ट असेल. आज तेजस्वी यादव यांचा वाढदिवस आहे तर उद्या(मंगळवारी) बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालात तेजस्वी यादव हे आणखी एक विक्रम साध्य करू शकतात.
बिहारमध्ये सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना सन्मान मिळू शकतो. यापूर्वी सतीश प्रसाद सिंह हे वयाच्या ३२ व्या वर्षी १९६८ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. तेजस्वी यादव हे ३१ वर्षांचे आहेत. १ जानेवारी १९३६ मध्ये जन्म घेतलेल्या सतीश प्रसाद यांचा कार्यकाळ अवघ्या ५ दिवसांचा होता. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव बिहारमधील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होतील पण त्यासाठी मंगळवारच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. शरद पवार हे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.