शिवसेना, अकाली दलानंतर भाजपाला आणखी एक धक्का; केंद्रीय मंत्र्यांच्या पार्टीने सोडली साथ
By प्रविण मरगळे | Published: October 4, 2020 07:40 PM2020-10-04T19:40:24+5:302020-10-04T19:42:39+5:30
Bihar Assembly Election 2020 News: आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आता लोक जनशक्ती पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये भाजपाला धक्का बसला आहे. नितीश कुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याने लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत लोक जनशक्ती पार्टीने निवेदन जारी करत म्हटलंय की, राष्ट्रीय स्तरावरील लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी भाजपासोबत कायम असेल. पण राज्यस्तरावर विधानसभा निवडणुकीत जनता दला यूनायटेडसोबत वैचारिक मतभेद असल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपाला धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
खरं तर, या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आरजेडी आपल्या पारंपारिक व्होटबँक मुस्लिम आणि यादव तसेच दलित मतदारांना एकत्र करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. पूर्वी जेडीयूचे दलित नेते श्याम रजकही आरजेडीमध्ये दाखल झाले. अशा परिस्थितीत आणखी एक दलित व्होटबँक असलेला पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याचा फटका त्यांना सहन करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर बरेच लहान पक्षही युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतदारांचा मूड कोणत्या दिशेने आहे हे येणार काळच ठरवेल.
आज संध्याकाळी लोक जनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने जाहीर केले आहे की, ते स्वबळावर बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एलजेपीची भाजपाशी युती मजबूत असल्याचंही लोक जनशक्ती पार्टीने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) यांच्या युतीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे बिहारमध्ये एलजेपीने युतीपासून स्वतंत्रपणे लढण्याचं ठरवलं आहे.
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर (७१ जागा), ३ नोव्हेंबर (९४ जागा) आणि ७ नोव्हेंबर (७८ जागा) अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर आहे.