जल्लोष नको, लगेचच पाटन्याकडे कूच करा; तेजस्वी यादवांचा उमेदवारांना संदेश
By हेमंत बावकर | Published: November 8, 2020 05:24 PM2020-11-08T17:24:43+5:302020-11-08T17:27:05+5:30
Bihar Election Result 2020 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. पासवान गटाने 25 जागांवर जदयूला फटका दिल्याचे सांगितले जात आहे.
बिहारच्या निवडणुकीचा धुरळा हळूहळू खाली बसू लागलेला असताना सर्वच पक्षांना निकालाचे वेध लागले आहेत. यातच काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलनी तेजस्वी यादव यांच्या राजद आघाडीला बहुमताचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यामुळे कोरोना संकटात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत विजयाचा जल्लोषही मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची शक्यता आहे. यावर तेजस्वी यादव यांनी नेत्यांना महत्वाची सूचना जारी केली आहे.
राजदच्या उमेदवारांनी विजयी झाल्यानंतर विजयाची रॅली किंवा जल्लोष साजरा करू नये. विजयाचा उत्सव जनता साजरा करेल. मतमोजणीवेळी उमेदवारांनी त्यांच्याच मतदार संघात रहावे आणि विजयी झालेल्यांनी त्यांना मिळालेले सर्टिफिकेट घेऊनच पटन्याकडे कूच करावे, असे आदेश दिले आहेत.
विजयाची जल्लोष यात्रा काढल्याने सामान्य नागरिकांना त्रास होईल, हा संदेश उमेदवारांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजदने चार जणांची टीम बनविली आहे. यामध्ये सुनील सिंह, संजय यादव, श्याम रजक आणि जगदानन्द सिंह आहेत. महत्वाचे म्हणजे एक्झिट पोलनी विजयाचे संकेत दिल्याने पटन्यातील राजदच्या कार्यालयाची रंगरंगोटी आणि साफसफाईचे कामही जोरात सुरु करण्यात आले आहे.
...तेव्हाच राजदची होळी, दिवाळी
9 नोव्हेंबरला तेजस्वी यादव यांचा वाढदिवसही आहे. पहिल्यासारखाच यंदाही वाढदिवस साजरा केला जाईल. परंतू लालू प्रसाद यादव यांना जामिन मिळालेला नाही. शपथ ग्रहन समारंभाला ते उपस्थित राहू नयेत म्हणून काही लोकाचे प्रयत्न आहेत. लालू जेव्हा तुरुंगातून बाहेर येतील तेव्हाच आमची होळी आणि दिवाळी साजरी होईल, असे गदानंद सिंह यांनी सांगितले. लालू प्रसाद यादव यांच्या जामिन अर्जावरील सुनावणी सुटीमुळे 29 नोव्हेंबरला होणार आहे. लालू यांची प्रकृती खालावली असल्याचे रिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले असून त्यांच्या किडन्या 25 टक्केच काम करत आहेत. लालू यांनी न्यायालयात 15 ते 20 आजारांची यादी दिली आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. मात्र, चिराग पासवान यांनी तिन्ही टप्प्यांमध्ये महायुतीत न राहूनही मी भाजपासोबत, असाच नारा देत महायुतीची मते फोडण्याचे लक्ष्य ठेवले होते. यानुसार सर्व्हेमध्ये पासवान गटाने 25 जागांवर जदयूला फटका दिल्याचे सांगितले जात आहे. तर अन्य एजन्सींचेदेखील एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 54.57 टक्के मतदान झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.