Bihar Election Result: देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात घेतला शिवसेनेच्या टीकेचा समाचार, म्हणाले...

By प्रविण मरगळे | Published: November 11, 2020 02:42 PM2020-11-11T14:42:35+5:302020-11-11T14:45:47+5:30

Bihar Election Result, BJP Devendra Fadanvis, Shiv Sena News: या टीकाकारांनी आत्मचिंतन करावं, नरेंद्र मोदी कसं काम करतायेत हे पाहावं असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

Bihar Election Result:BJP Devendra Fadnavis target Shiv Sena criticism in a few words | Bihar Election Result: देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात घेतला शिवसेनेच्या टीकेचा समाचार, म्हणाले...

Bihar Election Result: देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात घेतला शिवसेनेच्या टीकेचा समाचार, म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देवेगवेगळ्या राज्यात ज्यांच्यासोबत काँग्रेसशी युती आहे त्यांच्यामुळे काँग्रेसला मतदार उरला नाहीबिहार निकालाचं पूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिलं पाहिजे.राज्यातला भाजपाचा मतदार आणि कार्यकर्ता यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने तेजस्वी यादव यांचं कौतुक करतानाच भाजपावर निशाणा साधला होता, त्यावर चित हुए तो भी मेरी टांग उपर अशा शब्दात बिहार निवडणुकीचे प्रभारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांचे डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षाही कमी मतदान झालं, त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, भाजपा हा मोठा पक्ष आहे, केवळ बिहारमध्येच नाही तर इतर राज्यातील पोटनिवडणुकीतही लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला. लॉकडाऊन काळात जेव्हा लोक त्रासले होते, तेव्हा अनेक मंत्री, मुख्यमंत्री केंद्र सरकारवर टीका करत होते, त्या टीकेची पर्वा न करता नरेंद्र मोदी काम करत होते, लोकांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यामुळे या टीकाकारांनी आत्मचिंतन करावं, नरेंद्र मोदी कसं काम करतायेत हे पाहावं असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

तर शरद पवार हे मोठे नेते आहेत, मी लहान नेता आहे. पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाली, काही काळ कोरोनामुळे लढाई नव्हतो, पण मी आनंदी आहे, त्यामुळे कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. काँग्रेसला सध्या कोणीही विचारायला तयार नाही, वेगवेगळ्या राज्यात ज्यांच्यासोबत काँग्रेसशी युती आहे त्यांच्यामुळे काँग्रेसला मतदार उरला नाही, राजकारणात जर, तर या शब्दाला अर्थ नसतो, बिहार निकालाचं पूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिलं पाहिजे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यात फरक असतो, त्यामुळे मोठा आव आणला तरी तेथील स्थानिक जनता त्याचं उत्तर देतं असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.

त्याचसोबत राज्यातला भाजपाचा मतदार आणि कार्यकर्ता यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत, त्याची जबाबदारी सांभाळत आहोत, शेतकरी, मराठा आरक्षण यासारखे अनेक प्रश्न आहेत, काही जण ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी सामोरे जाऊ असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होईल का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

बिहारमध्ये महिलांनी भाजपाला जास्त मतदान केलं  

नरेंद्र मोदींवरच्या विश्वासाची लाट आहे, बिहारमध्ये १५ वर्ष सरकार होतं, त्यामुळे काही प्रमाणात अँन्टी इन्कम्बन्सी लाट असते, परंतु मोदींबद्दल लोकांना विश्वास आहे. पुरानंतर बिहारी लोकांना मदत केली, आपत्ती काळात लोकांच्या पाठिशी केंद्र सरकार ठाम उभे राहिले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. काँग्रेस आरजेडीच्या सभेत आलेल्या महिलांनीही नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला, ६ टक्के महिलांचे मतदान वाढलं. हा फरक निकालात दिसून आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 शिवसेनेचा भाजपावर निशाणा

बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो. तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढय़ सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱयांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले. नितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागलं.  नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. बिहारात नेमके काय होईल? ते पुढच्या ७२ तासांत स्पष्ट होईल असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Web Title: Bihar Election Result:BJP Devendra Fadnavis target Shiv Sena criticism in a few words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.