Bihar Election Result: “नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखं”

By प्रविण मरगळे | Published: November 12, 2020 11:27 AM2020-11-12T11:27:11+5:302020-11-12T11:31:57+5:30

Bihar Election Result, Nitish Kumar, BJP, Tejashwi yadav News:बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे असं कौतुकही शिवसेनेने केले आहे.

Bihar: Giving Nitish Kumar the CM post is like giving a winning medal to a losing wrestler Shivsena | Bihar Election Result: “नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखं”

Bihar Election Result: “नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखं”

googlenewsNext
ठळक मुद्देतेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे.मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली

मुंबई - बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? स्पष्टच सांगायचं तर बिहारला भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल. जनता दल युनायटेड पक्षाला लोकांनी धूळ चारली आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नितीश कुमारांना फटकारलं आहे.

तसेच तेजस्वी यादव(Tejashwi Yadav) या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे असं कौतुकही शिवसेनेने(Shiv Sena) केले आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकडय़ांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे.

तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपस लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे. अटीतटीच्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीस 125 जागा मिळाल्या. विधानसभा 243 आमदारांची आहे. त्यामुळे बहुमत 122 चे आहे.

पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांचा विजय किती निसरडा आहे ते समजून घ्या. तेजस्वी यादव यांच्या आघाडीस 110 जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा 100 ते 300 च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघांत मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळ घालून ‘जागा’ लाटल्या, असा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला.

‘राजद’ने 119 विजयी उमेदवारांची यादीच घोषित केली. पण निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. त्यातले सत्य काय ते नितीशबाबूंनाच माहीत, भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी पिंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो.

बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली.

चिराग पासवान(Chirag Paswan) यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार(Nitish Kumar) यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. चिराग पासवान यांनी जनता दलाच्या विरोधात जे उमेदवार उभे केले त्यामुळे नितीशकुमार यांच्या 20 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते.

इतके असूनही पंतप्रधान मोदी(Narendra Modi) यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली.

आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील. पण त्या बादशाहीवर ‘110’ आकडा असलेल्या भक्कम विरोधी पक्षाचा अंकुश राहील.

Web Title: Bihar: Giving Nitish Kumar the CM post is like giving a winning medal to a losing wrestler Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.