बायोमेट्रिक मतदान यंत्र; बोगस मतदानाला आळा-: शिवाजी विद्यापीठातील मल्लिकार्जुन भिसे याचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:10 AM2019-03-28T01:10:36+5:302019-03-28T01:11:35+5:30
बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून मल्लिकार्जुन प्रभू भिसे याने व्होटिंग मशीन (मतदान यंत्र) साकारले आहे. त्यामध्ये मतदारांना बोटांच्या ठशांद्वारे (फिंगरप्रिंट) मतदान करता
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून मल्लिकार्जुन प्रभू भिसे याने व्होटिंग मशीन (मतदान यंत्र) साकारले आहे. त्यामध्ये मतदारांना बोटांच्या ठशांद्वारे (फिंगरप्रिंट) मतदान करता येते. या मशीनचा वापर केल्यास मतदानाच्या वेळेत बचत होणार असून, बोगस मतदानाला आळा बसेल, असा दावा त्याने केला आहे.
चाकूर (जि. लातूर) येथील मल्लिकार्जुन शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्समध्ये एम.एस्सी.च्या द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे. त्याने बोटांच्या ठशांवर आधारित असलेले ‘फिंगरप्रिंट बेस्ड व्होटिंग मशीन’ साकारले आहे. फिंगरप्रिंट मोड्यूल, आरडीनो (एव्हीआर मायक्रो कंट्रोलर) स्विच, डिस्प्ले, एलईडी यांच्या वापरातून हे यंत्र तयार केले आहे.
मतदाराचे फिंगरप्रिंट प्रथम घेतले जाईल. त्याची पडताळणी यंत्रातील माहितीबरोबर करण्यात येईल. संबंधित मतदाराची फिंगरप्रिंट व यंत्रातील माहिती जुळल्यानंतर त्याला मतदानाची परवानगी केंद्रप्रमुख देतील. त्यासाठी त्यांनाही फिंगरप्रिंटचा वापर करावा लागेल. एखादा मतदार दुसऱ्यांदा मतदानासाठी आला, तर फिंगरप्रिंटद्वारे त्याला ओळखले जाईल व संबंधित यंत्रातील लाल एलईडी लागून बझर वाजेल. दुबार मतदानाला आळा बसणार आहे. संबंधित यंत्राच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी ओळखपत्र वापरावे लागणार नाही.
‘आधार’ची माहिती समाविष्ट करावी लागणार
‘फिंगरप्रिंट बेस्ड’ मतदान यंत्रामध्ये पहिल्यांदा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडील (यूआयडीआय) प्रत्येकाची ‘आधार’बाबतची माहिती समाविष्ट करावी लागणार आहे. या यंत्रामध्ये पाच हजार जणांची माहिती समाविष्ट करता येते. यंत्र सुरक्षिततेसाठी त्यात केंद्रप्रमुख, निवडणूक अधिकाऱ्याचे फिंगरप्रिंट, लॉगीन आयडी असणार आहे. फिंगरप्रिंटने प्रक्रिया होईल. साडेतीन हजारांत हे यंत्र तयार केले आहे. त्यासाठी डॉ. एम. के. भानारकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे मल्लिकार्जुन याने सांगितले.
‘ईव्हीएम’ मशीन प्रगत करण्याच्या उद्देशाने मल्लिकार्जुन याने संशोधनातून ‘फिंगरप्रिंट बेस्ड’ मतदान यंत्र साकारले आहे. प्रमाणीकरण करणाºया संस्थेकडून त्याची तपासणी करून पेटंटसाठी अर्ज करण्यात येईल.
- डॉ. एम. के. भानारकर, मार्गदर्शक