एकनाथ खडसे गटाला दे धक्का; सहा नगरसेवक शिवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:51 AM2021-05-27T08:51:31+5:302021-05-27T08:51:48+5:30
Maharashtra Politics: मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या नगरसेवकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
मुक्ताईनगर (जि. जळगाव) : मुक्ताईनगरातील एकनाथ खडसे यांच्या गटाला बुधवारी जोरदार धक्का बसला. त्यांचे समर्थक असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आणखी चार नगरसेवक वेटींगवर असल्याची माहिती मिळाली.
मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या नगरसेवकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यामुळे जळगाव मनपापाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतमध्येही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.
१७ पैकी भाजपचे होते १३ नगरसेवक मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे सन २०१८ मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यानंतर झालेल्या निवडणुकीत १७ पैकी १३ नगरसेवक हे भाजपाचे अर्थातच एकनाथ खडसे गटाचे निवडून आले होते. एका अपक्ष उमेदवाराने खडसे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खडसे गटाकडे १४ नगरसेवक झाले होते. शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. हे नगरसेवक हे भाजपाचे असले तरी खडसे समर्थकच होते.
यांनी दिली सोडचिठ्टी
शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते पियुष महाजन, उपगटनेते संतोष कोळी, माजी सभापती मुकेश वानखेडे, बिल्किसबी अमानुल्ला खान, शबाना बी अब्दुल आरिफ , नुसरतबी मेहबूब खान यांचा समावेश आहे. या तीन नगरसेविकांचे पती मुंबईत उपस्थित होते.