Salman Khurshid: खुर्शीदांविरोधात भाजप आक्रमक; पोलिसात करणार तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 10:21 AM2021-11-12T10:21:32+5:302021-11-12T10:21:49+5:30
सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’, असं या पुस्तकाचं नाव असून त्यामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकातील संदंर्भावर भाजपाकडून टीका होत आहे. त्यातच आज भाजप आमदार राम कदम, खुर्शिद यांच्याविरोधात मुंबई पोलिसात तक्रार करणार आहेत.
आज घाटकोपर पोलिस ठाणे मध्ये सकाळी 11.30 वाजता सलमान खुर्शीद यांच्या विरोधात FIR करणार. हिंदुत्व आणी isis मध्ये फरक काय ? हे समजून घेण्यासाठी त्यांना पाकिस्तानमध्ये जायचे असल्यास त्यानी खुशाल जावे. हिंदुत्वाचा अपमान करणार्या भारताच्या पवित्र भूमित खुर्शीद यांची आवश्यकता तरी काय ? असा सवाल भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
पुस्तकात काय म्हटलं आहे ?
नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये सलमान खुर्शिद यांनी ही तुलना केली आहे “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या पान क्रमांक ११३ वर हा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मुद्द्यावरून सध्या वाद निर्माण झाला असून या पुस्तकावर आणि सलमान खुर्शिद यांच्यावर टीका केली जात आहे.