ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:14 PM2021-06-03T12:14:53+5:302021-06-03T13:18:27+5:30

OBC reservation in local bodies: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे.

BJP is aggressive over OBC reservation in local bodies, intense agitation in various parts of the state | ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन 

ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन 

Next

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने ओबीसींच्या आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांत भाजपाच्यावतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. 

नुकत्याच रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ठाण्यामध्ये  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदर संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या आदेशानुसार तीव्र बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ  सचिन केदारी  यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, नाशिकमध्येही भाजपाच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले. पंचायत राज मध्ये ओबीसींचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नाशिकमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने  न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन न केल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे असा आरोप करून भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला तसेच ओबीसींच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी शहराध्यक्ष विजय साने, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 

अहमदनगरमध्येही  भाजपा ओबीसी मोर्चाचेवतीने ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.  यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, प्रकाश चित्ते, युवराज पोटे, वसंत लोढा, सचिन पारखी आदी उपस्थित होते. 

Web Title: BJP is aggressive over OBC reservation in local bodies, intense agitation in various parts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.