बाळासाहेब सानपांना मानाचे पान; भाजपाचे नवे प्रदेश उपाध्यक्ष जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 01:53 PM2021-01-11T13:53:34+5:302021-01-11T13:54:22+5:30
balasaheb sanap Politics News: नाशकातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव बघावा लागला त्यामुळे ते राष्ट्रवादीचा उंबरा सोडून शिवसेनेत दाखल झाले.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपात घरवापसी केल्याने त्यांना पद काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावर आज सानपांना भाजपाने दुसऱ्या क्रमांकाचे मानाचे पान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अलीकडेच भाजपमध्ये परतलेले नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.
नाशकातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव बघावा लागला त्यामुळे ते राष्ट्रवादीचा उंबरा सोडून शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या येण्याची उपयोगिता सिद्ध न होऊ शकल्याने शिवसेनेतही ते अडगळीतच होते; यामुळे सानपांनी पुन्हा भाजपात जाणे पसंत केले होते.
महाजनांचे बोट सुटले आणि परिस्थिती फिरली
भाजपत असताना व आमदारकीच्या काळात प्रारंभीच्या दिवसात गिरीश महाजन यांची मर्जी संपादन करून असल्यामुळे सानप यांचा स्थानिक पातळीवर पक्षात व महापालिकेतही दबदबा होता. मला नाही तर अन्य कुणासही नाही, असा त्यांचा हेका राहिल्याने भाजपच्या सत्ताकाळात नाशिकच्या वाट्याला मंत्रिपद लाभू शकले नव्हते. सानप पक्षाचे शहराध्यक्ष असताना महापालिकेत प्रथमच स्वबळावर या पक्षाची सत्ता आली, त्यामुळे ओघाने तेथेही त्यांचीच चलती होती; पण महाजनांचे बोट सुटले आणि तेथूनच परिस्थिती बदलली.