भाजपा प्रदेश कार्यकारिणी जाहीर; पंकजा मुंडे दिल्लीत, बावनकुळेंचे पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:02 AM2020-07-04T04:02:37+5:302020-07-04T04:02:57+5:30
कार्यकारिणीवर माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते.
मुंबई : भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारणीत जबाबदारी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीत त्या पूर्वीप्रमाणेच कायम राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपची प्रदेश कार्यकारिणी चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केली.
या कार्यकारिणीत माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावळ, डॉ.संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, खा. प्रीतम मुंडे, आ. प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक खा.कपिल पाटील, खा. डॉ. भारती पवार आणि जयप्रकाश ठाकूर असे अकरा १२ उपाध्यक्ष आहेत तर आ.सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, आ. देवयानी फरांदे, आ. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत भारतीय आणि विजय पुराणिक (संघटन) असे ६ सरचिटणीस आहेत. मिहिर कोटेचा यांना कोषाध्यक्षपद देण्यात आले आहे.
कार्यकारिणीवर माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते. जातीय संतुलन जातीय आणि विभागीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणाऱ्या काही जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आलेले केशव उपाध्ये हे गेल्या २० वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम करीत आहेत. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये प्रवक्ते म्हणून उपाध्ये यांची नियुक्ती केली. सर्व मराठी तसेच हिंदी, राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.