पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी?; भाजपानं शिवसेनेला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 12:22 PM2020-09-12T12:22:43+5:302020-09-12T13:56:25+5:30
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला असताना आता शिवसेनेविरोधात नवा वाद निर्माण झाला आहे. एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांनी बेदम मारलं, त्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती त्यांना जामीनही मिळाला आहे.
या प्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण केली त्याचा निषेध आहे. पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत..
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 12, 2020
आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!!
पुढे काय?
दाऊदला पालिकेचे टेंडर
आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?
तर निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाही, साठी उलटलेल्या अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात यांना भामटे नाही तर काय म्हणावं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून हुकूमशाही करत आहेत असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
साठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात, यांना भामटे नाही तर काय म्हणावं???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
काय आहे प्रकरण?
कांदिवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ६५ वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.
शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तिचा मला फोन आला. त्यांनी माझं नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डींग खाली आले त्यांनी मला खाली बोलावलं. बिल्डींगच्या गेटवर ८ ते १० जणांनी मला बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कमलेश कदमसह ८ ते १० जणांवर कलम ३२५, १४७, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमलेश कदमसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.