“आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी”; भाजपचा एकनाथ खडसेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 05:56 PM2021-07-07T17:56:09+5:302021-07-07T17:57:18+5:30
भाजपने एकनाथ खडसेंवर खोचक टीका केली असून, आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी, असे म्हटले आहे.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून केल्या जात असलेल्या कारवायांवरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी भाजप यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी नेते गिरीश चौधरी यांच्यावर ईडीने कारवाई सुरू केली आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. आता या मुद्द्यावरून भाजपने एकनाथ खडसेंवर खोचक टीका केली असून, आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी, असे म्हटले आहे. (bjp atul bhatkhalkar criticised eknath khadse over bhosari midc land scam)
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना तुम्ही ईडी लावलीत तर मी सीडी लावेन, असे सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यावरूनच आता, आता कुणाला काय सीडी लावायची, ती त्यांनी लावावी, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”
कर नाही त्याला डर कशाला?
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरु केली होती. त्यामुळे ईडी आता याप्रकरणाचा तपास करत आहे. मुळात कर नाही त्याला डर कशाला, अशी विचारणा करत आता कुणाला काय सीडी लावायचेय ती त्यांनी लावावी, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर एकनाथ खडसे यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.