Narayan Rane vs Shivsena : "राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 04:35 PM2021-08-24T16:35:46+5:302021-08-24T16:43:32+5:30
BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?" असं म्हटलं आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले होते. मात्र पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. अखेर नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. याच दरम्यान आता अटकेवरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?" असं म्हटलं आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना (Shivsena) आणि ठाकरे सरकारवर (Shivsena) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Narayan Rane) हे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली? पिक्चर तो अभी शुरू हुई है, भाऊ..." असं म्हटलं आहे. तसेच "सूड दुर्गे सूड" असं म्हणत एक फोटोही पोस्ट केला आहे. "जनतेचा पाठिंबा आणि विश्वास नसेल तर पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ येते... हे फार काळ चालत नाही, ठाकरे सरकार..." असं देखील भातखळकर यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री @MeNarayanRane पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021
पिक्चर तो अभी शुरू हुई है, भाऊ...
नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे.
सूड दुर्गे सूड... pic.twitter.com/k3lGn8tgz2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021
"नारायण राणेंचा फुगा फुटला, सामान्य शिवसैनिकांनीच तो फोडला; सध्या ते ऑक्सिजनवर आहेत"
शिवसेनेने आता नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे (Shivsena Dr. Manisha Kayande) यांनी राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या ट्विर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना रोज मुजरा करावा लागतोय. मंत्रीपद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मातोश्रीवर टीका करावीच लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही" असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.