'प्राप्तिकर खात्यातर्फे धाडी घालून भाजप विजय रोखू शकत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:17 AM2019-04-18T04:17:06+5:302019-04-18T04:17:35+5:30
प्राप्तिकर खात्यामार्फत धाडी टाकून दडपण आणण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी या पक्षाला लोकसभा निवडणुकीतील माझा विजय रोखता येणार नाही, असे द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या कणिमोळी यांनी म्हटले आहे.
तुतुकोडी : प्राप्तिकर खात्यामार्फत धाडी टाकून दडपण आणण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी या पक्षाला लोकसभा निवडणुकीतील माझा विजय रोखता येणार नाही, असे द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या कणिमोळी यांनी म्हटले आहे. त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी घातलेल्या छाप्यात प्राप्तिकर खात्याला काहीच सापडले नाही.
कणिमोळी तामिळनाडूतील तुतुकोडीमधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची माहिती मिळाल्यामुळे प्राप्तीकर खात्याने मंगळवारी संध्याकाळी तिथे धाड टाकली होती. मात्र त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. आम्हाला मिळालेली माहिती चुकीची होती, असे या अधिकाऱ्यांनी बुधवारी मान्य केले.
त्यानंतर कणिमोळी म्हणाल्या की, कुटील हेतू बाळगून टाकण्यात आलेली ही धाड लोकशाहीविरोधीही होती. तुतुकोडीमध्ये उद्या, गुरुवारी मतदान होणार असून त्याच्या आधी धाड घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. धाडीच्या वेळी कणिमोळी घरीच होत्या. कारवाई सुरू असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर द्रमुकचे कार्यकर्त्यांनी मोदीविरोधी घोषणा देत होते.
द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हणाले, निवडणुकांत पराभूत होण्याच्या भीतीने भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर चालविला आहे. प्राप्तीकर खात्याने गेल्या आठवड्यात चेन्नई, नमक्कल, तिरुनेलवेली यासह १८ ठिकाणी विरोधी पक्षांतील नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या.
>पक्षपाती कारवाई : चिदम्बरम
कणिमोळी तसेच अन्य विरोधी नेत्यांच्या निवासस्थाने, कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याने टाकलेले छापे ही पक्षपाती कारवाई होती अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. ते म्हणाले की, फक्त विरोधी पक्षांतील नेत्यांच्या व्यवहारांबाबतच प्राप्तिकर खात्याला खास माहिती मिळाली, हीच गोष्टच मुळात संशयास्पद आहे.