Video: “संजय राऊतजी, आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे ते सांगा”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:26 AM2021-07-09T10:26:46+5:302021-07-09T10:28:38+5:30
तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला.
मुंबई – नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट विस्तारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला होता. धर्मेंद्र प्रधान हे देशाला नवे शिक्षणमंत्री मिळाले. आधी ते पेट्रोलियम मंत्री होते, मी त्यांना ओळखतो. कालपर्यंत ते रॉकेल, पेट्रोल विकत होते. याआधी रमेश पोखरियाल होते. ते शाळेतच गेले नव्हते पण ते देशाचे शिक्षणमंत्री होते. त्याच्याआधी स्मृती इराणी होत्या त्या मॉडेलिंग करायच्या. म्हणजेच शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण घडवतात अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलं होतं. यावर भाजपाने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, तुमच्या बंधूंनाही मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा आहे. मग तुम्हालाही काँग्रेस राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल. तुम्ही केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल जे काही बरळलात, त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामना संपादकपदाचा काय संबंध आहे ते सांगा. मग मी स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा काय संबंध याचा खुलासा करेन. तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा त्यांनी दिला.
तसेच संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) कधी नव्हे ते खरं बोलले. नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप जास्त आहे. ती यापुढेही वाढत जाईल. म्हणून शिवसेनेला ते झेपलं नाही असा टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे. नारायण राणेंची उंची मोठी आहे पण त्यांना दिलेलं खातं शोभत नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरून भाजपाने शिवसेनेवर पलटवार केला आहे.
संजयजी राऊत काल मा. @smritiirani बद्दल जे बरळलात…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 9, 2021
मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे??
ते सांगा
मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन… @rautsanjay61@BJP4Maharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/zvGvofjChi
सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर साधला निशाणा
नारायण राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल, असं सामनात म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्या डॉ. भारती पवार व नेते कपिल पाटील हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे. भाजपाचे नेते डॉ. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारला आहे.