“अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
By प्रविण मरगळे | Published: February 21, 2021 10:32 AM2021-02-21T10:32:24+5:302021-02-21T10:55:26+5:30
BJP Target CM Uddhav Thackeray: कोरोनाशी लढा संपलेला नाही, त्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे केली होती,
मुंबई – राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं(Coronavirus in Maharashtra) पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Target CM Uddhav Thackeray)
अतुल भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी...मग दुसऱ्यांना सल्ला द्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
कोरोनाचा लढा संपलेला नाही. अशा वेळी कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.
कोरोना काळात भाजपाकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती, मुख्यमंत्री फिल्डवर न फिरता फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते, सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहण्यासाठी मुख्यमंत्री कधीही फिरकले नाही, केवळ मातोश्रीत बसून मुख्यमंत्री सरकार चालवतायेत असा आरोप विरोधकांकडे केला जात होता, त्यातच कार्यालयीन वेळा बदलण्याच्या मागणीवरून भाजपाने ही टीका केली आहे.
पाच दिवसांत पश्चिम अन् मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासीसंख्येत २ लाखांची घट
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, यानंतर कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याचं काहींचे म्हणणं आहे, त्यामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत मागील पाच दिवसांत एकूण २ लाखांनी घट झाली आहे.
लोकल सुरू झाल्याने नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १९ तारखेला ती १६,८८,२६० पर्यंत खाली आली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १९ फेब्रुवारीच्या प्रवासीसंख्येत एक ते दीड लाखांची घट झाली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारी रोजी २३,३९,१३१ अशी प्रवासीसंख्या होती, तर १९ फेब्रुवारीला ही प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.