Narayan Rane: राणेंच्या यात्रेआड भाजपची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:51 AM2021-08-23T08:51:31+5:302021-08-23T08:52:14+5:30

Narayan Rane Jan Ashirwad yatra: स्मृतिस्थळावरील संघर्ष टाळत शिवसेनेने पहिल्या फेरीत राणे यांची एकप्रकारे कोंडी केली होती. मात्र, तथाकथित शुद्धीकरणाचा घाट घालून शिवसेनेने राणे यांना संधी दिली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून राणे यांनी याचा पुरेपूर उपयोग केला.

BJP forms front for elections from Narayan Rane's Jan Ashirwad yatra | Narayan Rane: राणेंच्या यात्रेआड भाजपची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

Narayan Rane: राणेंच्या यात्रेआड भाजपची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन दिवसांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करायला सुरूवात केली आहे. राणे यांच्या यात्रेच्या निमित्ताने पक्षसंघटनेला कामाला लावतानाच शिवसेनेला घेरण्याचा पद्धतशीर प्रयत्न यानिमित्ताने झाला आहे. मराठी पट्ट्यावर या यात्रेचा भर होता. तसेच, सत्ताधारी पक्षातील नाराज मंडळींना भाजपमध्ये मानाचे स्थान आहे, हा संदेश योग्य ठिकाणी पोहचविण्याची तजवीज या निमित्ताने करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विशेषतः अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, दिशा सॅलियान मृत्यू, अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध राज्य सरकार अशा मुद्द्यांवर राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या प्रकरणांमुळे पहिल्या टप्प्यात राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, याचा एक उलटा परिणामही मुंबईत झाला. भाजप मराठी विरोधी असल्याचे चित्र उभे करण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश मिळाले होते. ही प्रतिमा बदलण्यात भाजप अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत होते. राणे यांच्या एकाच यात्रेने भाजपची ही समस्या सोडवली. यात्रेच्या मार्गाचीही तशीच आखणी करण्यात आली होती. विमानतळावर शिवरायांना अभिवादन करून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला दिलेली भेट चर्चेत होती. शिवाय, नायगाव येथील सभेत राणे यांनी मुंबईच्या बकालीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. मराठी माणसाला काय मिळाले, शिवसैनिकांना अजूनही खस्ता खाव्या लागत आहेत, मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले, ही राणे यांची विधाने भाजपचा रोख स्पष्ट करणारी ठरली.

स्मृतिस्थळावरील संघर्ष टाळत शिवसेनेने पहिल्या फेरीत राणे यांची एकप्रकारे कोंडी केली होती. मात्र, तथाकथित शुद्धीकरणाचा घाट घालून शिवसेनेने राणे यांना संधी दिली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून राणे यांनी याचा पुरेपूर उपयोग केला. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची दुरवस्था झाल्याचा ठपका ठेवत आधी त्याला जागतिक दर्जाचे बनवा, असा टोला लगावला. 

सारे काही मुंबई महापालिकेसाठी
nपालिका निवडणुकांसाठी आपण स्वतः मुंबईभर फिरणार, भाजपच जिंकणार असेही राणे बोलून गेले. मुंबईतील विविध भागात राणे यांचा स्वतःचा समर्थक वर्ग आहे. 
nमतांच्या टक्केवारी किंवा आकडेवारीच्या दृष्टीने ते अल्प असले तरी वातावरण निर्मितीत राणे यांची उपयुक्तता यानिमित्ताने समोर आली आहे.

Web Title: BJP forms front for elections from Narayan Rane's Jan Ashirwad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.