"रोहित पवारांचं धोरण म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार, आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड?"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:46 PM2021-02-20T14:46:12+5:302021-02-20T15:05:25+5:30
BJP Gopichand Padalkar And NCP Rohit Pawar : "सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वरती बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते,दिग्दर्शक का गप्प होते?"
मुंबई - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून पडळकरांनी निशाणा साधला आहे. "ये पब्लिक है सब जानती है!" असं म्हणत एका फेसबुक पोस्टद्वारे पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. "सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वरती बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते?" असा सवाल केला आहे.
"वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी १.५ कोटी विद्यापीठ व १.५ कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठ १ कोटीचा निधी द्यायला तयार होतं, त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली पण हे सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे 'पई पाव्हण्यांचं सरकार' याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय.कारण पहिली स्मारक समिती सुडबुद्धीने बरखास्त करून आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहिल? याची सोय लावलीये" असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
ये पब्लिक है सब जानती है!
सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात...
Posted by Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर on Friday, February 19, 2021
"रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत 'पोस्टर बॉय' बनवायचंय का?"
"स्मारकासाठी, नामांतरासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. सोलापूरचा आणि रोहित पवारांचा काहीही संबंध नसताना त्यांना स्मारक समितीत स्थान दिलंय. आणि त्यांना समितीवर घेतल्याघेतल्या निधी मंजूर केला. म्हणजे रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला 'पोस्टर बॉय' बनवायचंय का? मुळात स्मारक समितीमध्ये राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते,राजकारणातील आदर्श भाई गणपतरावजी देशमुख साहेब ज्यांनी विधानसभेत ११ वेळा प्रतिनिधित्व केल.त्यांच नाव ७ नंबर ला टाकून नेमक तुम्हाला काय साध्य करायच होत. मंत्री उदय सामंत जी यांना भेटताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे जी व अन्य सदस्य यांना का सोबत घेऊन गेला नाहीत."
"साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही"
"रोहित पवारांचं धोरण म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उधार'.. आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड? जिथं जिथं अहिल्यादेवींचं नाव आहे, तिथं तिथं तुम्ही श्रेय घ्यायला येतायेत. हे कालच्या जेजूरी गडाच्या प्रकरणावरून समस्त बहुजन समाजाला कळलं आहे. समस्त बहुजन समाजाने हा प्रस्थापितांचा डाव ओळखलाय. पण एक लक्षात ठेवा.. आता, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही...." असं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणत गोपीचंद पडळकरांनी घणाघाती टीका केली आहे.