कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:24 PM2020-08-09T13:24:58+5:302020-08-09T13:26:52+5:30
शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी मंत्री जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
शिरोळ – मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडून भाजपानं सत्ता स्थापन केली, त्यानंतर राजस्थानमध्ये सध्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस सरकारवर टांगती तलवार आहे, महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच राज्यात कोरोना संकट संपल्यानंतर भाजपाचं सरकार अस्तित्वात येईल असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
महाराष्ट्रात ऑपरेशन कमळबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सध्या कोरोनाचं संकट आहे, हे संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपाचं सरकार निश्चित येईल. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचेच सरकार पाहिजे असं त्यांनी सांगितले. शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तसेच गेल्या २ वर्षात कोल्हापूर महापूर स्थिती लक्षात घेतली असता दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय नव्हता, मात्र सध्या दोन्ही राज्यात समन्वय आहे. गेल्यावर्षी महापूराचा फटका दोन्ही राज्यातील जनतेला बसला होता. तो अनुभव लक्षात घेता दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय राखला आहे. त्यामुळे संभाव्य धोका नसल्याचा विश्वास मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला.
मात्र मंत्री जोल्ले यांनी राज्यातील सरकारबाबत केलेल्या विधानामुळे राज्यात भाजपाचं ऑपरेशन लोटस पडद्यामागे सुरु असल्याचं दिसून येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ऑक्टोबर-नोव्हेंबर सरकार पाडणार असल्याचं बोललं जातं आहे, पाडायचं तर आत्ताच पाडा, हे महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी याचं स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं सांगत थेट विरोधकांना आव्हान दिलं होतं.
त्यानंतर हे सरकार पाडण्याची भाजपाला गरज नाही, आमची लढाई कोरोनासोबत आहे, या परिस्थितीत सरकारचं अस्तित्व दिसत नाही, त्यामुळे सरकार पाडण्याचं आव्हान देण्याआधी सरकार चालवून दाखवावं असं प्रतिआव्हान देत सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नाही, त्यामुळे एकमेकांच्या भांडणातूनच हे सरकार स्वत:हून कोसळेल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.