चित्रा वाघ यांच्यावर भाजपानं सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांनी पाठवलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:27 PM2021-06-30T14:27:21+5:302021-06-30T14:41:08+5:30
पक्षाने चित्रा वाघ यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे
मुंबई – भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. भाजपात आल्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने प्रदेश उपाध्यक्षा पदाची जबाबदारी सोपवली होती. मागील अनेक महिन्यांपासून चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधात आक्रमक पवित्रा घेत प्रसंगी रस्त्यावरही उतरल्याचं दिसून आलं.
पक्षाने चित्रा वाघ यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. चित्रा वाघ यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात चंद्रकांत पाटील म्हणतात की, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून आपण जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात. गेल्या अनेक वर्षे आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात. युवती आणि महिला या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव आहे असं त्यांनी म्हटलं.
त्यामुळे आगामी काळात भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी चित्रा वाघ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल व त्यांचा संघटनेला निश्चित लाभ होईल असा विश्वास आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चित्रा वाघ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र - युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2021
पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते
प्रदेशध्यक्ष मा.@ChDadaPatil
विधीमंडळ नेते @Dev_Fadnavis जी मा.@SMungantiwar मनस्वी आभार pic.twitter.com/Z7AkKkA7NE
कोण आहेत चित्रा वाघ?
जवळपास २० वर्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केले आहे. भाजपा सरकार सत्तेत असताना चित्रा वाघ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वाघ यांनी भाजपात प्रवेश केला. महिलांच्या प्रश्नांवर चित्रा वाघ यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाण या युवतीचं नाव पुढे आल्यापासून राठोड यांचा राजीनामा घेईपर्यंत चित्रा वाघ यांनी अत्यंत मोलाची भूमिका निभावली. राष्ट्रवादी सोडल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. परंतु त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात स्वत:चा आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना युवती विभागाच्या प्रभारीपदाची नवीन जबाबदारी दिली आहे.