Coronavirus: “घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:51 PM2021-11-25T16:51:19+5:302021-11-25T16:54:03+5:30

घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडले. संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली, अशी टीका करण्यात आली आहे.

bjp heena gavit slams uddhav thackeray govt over corona situation issue in maharashtra | Coronavirus: “घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”

Coronavirus: “घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला”

googlenewsNext

नवी दिल्ली: प्रत्येक अपयशावर पांघरुण घालत केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकार (Thackeray Govt) कोरोना काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात कमी पडल्यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे. घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अशी घणाघाती टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार डॉ. हीना गावित यांनी केली आहे. 

डॉ. हीना गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने करोना काळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे, अशी बोचरी टीका गावित यांनी केली आहे. 

भ्रष्टाचार सुरूच राहिल्याने आर्थिक स्थिती खालावली

कोरोना काळात महाराष्ट्रात मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरु होती. भ्रष्ट कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली. केंद्र सरकारकडून वेळोवेळी कानपिचक्या मिळाल्यानंतरही भ्रष्टाचार सुरूच राहिल्याने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली. पण, सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्याने मात्र संधीची चांदी करून घेतली, या शब्दांत हीना गावित यांनी हल्लाबोल केला. 

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडले

कोरोना संकटाच्या कालावधीत मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आणि जनतेला वाऱ्यावर सोडले. तसेच गंभीर संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली. या अपयशास ‘मी जबाबदार’ असे नागरिकांकडून वदवून घेताना, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळत ‘माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी’, असा बेजबाबदार बाणाही दाखविला, अशी टीका गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

केंद्राने दिलेल्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या

आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या, याचा हिशेब जनतेस द्या. कोरोनाकाळात जेव्हा महाराष्ट्रातील जनता आर्थिक संकटामुळे हतबल झाली होती, तेव्हा ठाकरे सरकारचे मंत्री मात्र भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीतून कोट्यवधींचा मलिदा उकळत होते. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच जनतेकडे दुर्लक्ष झाल्याचे टीकास्त्रही गावित यांनी ठाकरे सरकारवर सोडले.
 

Web Title: bjp heena gavit slams uddhav thackeray govt over corona situation issue in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.