“हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार”; भाजपाचा ठाकरे सरकारला टोला

By प्रविण मरगळे | Published: January 8, 2021 10:03 AM2021-01-08T10:03:02+5:302021-01-08T10:06:10+5:30

एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र सरकारच्या फक्त थापा हे सरकार देत आहे

BJP Keshav Upadhye Target Thackeray government & Shiv Sena | “हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार”; भाजपाचा ठाकरे सरकारला टोला

“हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार”; भाजपाचा ठाकरे सरकारला टोला

Next
ठळक मुद्देन्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतेच आहेआघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच आहे

मुंबई – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केले आहे, मात्र त्यासाठी “मुंबई मा जिलेबी फाफडो, उद्धव ठाकरे आपडो” असं घोषवाक्य तयार करण्यात आलं, त्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात राजकारण रंगलं आहे. उद्धव ठाकरे सरकार आपडो नाही तर थापडो सरकार असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

याबाबत केशव उपाध्ये म्हणाले की,  न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर मिळत असलेल्या थपडा आणि जनतेला राज्यातील आघाडी सरकारांकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे असा टोला त्यांनी लगावला.

तर न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतेच आहे. मंत्री विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशीर ठरविण्याचा आलेला निर्णय ताजा आहे, त्याशिवाय पदवी परिक्षा, ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक, मेट्रो कारशेड, अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आलेले अपयश ही सुध्दा थप्पडच आहे असंही भाजपाने सांगितले.  

त्याशिवाय एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र सरकारच्या फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या सरकारकडून फक्त थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकऱी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा जनतेला देत असलेल्या थापांची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच आहे असा चिमटाही केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला काढला आहे.

शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

Web Title: BJP Keshav Upadhye Target Thackeray government & Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.