पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:17 PM2021-02-12T15:17:07+5:302021-02-12T15:20:11+5:30
Shiv Jayanti 2021: ठाकरे सरकारनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना, भाजपाकडून संताप व्यक्त
कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं. मात्र, राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
"भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारी पासून याचचं हं. सरकारचं असं आमंत्रण आलय बर का. पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!," असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2021
सरकारचं असं आमंत्रण आलय बर का!
पण खबरदार जर
जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..
असे सरकारचे आदेश पण आलेत.
त्यामुळे सांभाळा!
अजब वाटले तरी नियम पाळा!!
ठाकरे सरकार करेल,
तेच नियम आणि तेच कायदे!!
काय आहे विषय?
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण पसरलं आहे, सुरुवातीच्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केलं, परंतु आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे, लॉकडाऊनमुळे अनेक कार्यक्रमांना मर्यादा आली होती, लग्नसोहळे, समारंभ अशा विविध कार्यक्रमासाठी नियमावली आखून दिली जात होती, कोरोना सध्या नियंत्रणात असला तरी राज्य असो वा केंद्र सरकार विशेष खबरदारी घेत आहे, १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, तत्पूर्वी ठाकरे सरकारने शिवजयंती कशी साजरी करावी यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र या मार्गदर्शक सूचना देत असताना ठाकरे सरकारला एका चुकीचा फटका बसला आहे, शिवजयंती साजरी करताना केवळ १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी असं परिपत्रक गृह विभागाकडून काढण्यात आलं होतं, परंतु ठाकरे सरकारच्या या निर्णयावर शिवप्रेमींकडून टीका होत असताना पुन्हा यातील चूक सुधारत गृह विभागाने दुसरं शुद्धिपत्रक काढलं, यात म्हटलं आहे की, शासन परिपत्रक ११ फेब्रुवारी २०२१ मधील मुद्दा ३ मधील ओळ क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात येत असून आता १० ऐवजी १०० असे वाचावे, असं स्पष्टीकरण दिलं आहे
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
१) अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
२) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
३) कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
४) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,
६) Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे