"या वयात अनिल देशमुखांना लपाछपीचा खेळ झेपेल असं वाटत नाही’’, भाजपा नेत्याचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:14 PM2021-07-19T15:14:16+5:302021-07-19T15:17:24+5:30
Anil Deshmukh News: ईडीकडून होत असलेल्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई होईल, आसा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या अनेक नेत्यांकडून केला जात आहे.
मुंबई - ईडीकडून चहुबाजूंनी होत असलेल्या चौकशीमुळे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे पुरते अडचणीत आले आहेत. दरम्यान, ईडीकडून होत असलेल्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई होईल, आसा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या अनेक नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक सूचक विधान केले आहे.
अतुल भातखळकर यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख यांचे आता वय झाले आहे. या वयात त्यांना लपाछपीचा खेळ झेपेल, असे वाटत नाही, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
दरम्यान, शुक्रवारी अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. त्यानंतर रविवारी ईडीची दोन पथके अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. वडविहिरा हे देशमुख यांचे मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. दरम्यान, येथे छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतले होते.
अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.. या जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील १ कोटी ५४ लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील २५ प्लॉट्सचा समावेश आहे.