"दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत"; जयंत पाटलांना भाजपा नेत्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:13 PM2020-12-10T16:13:35+5:302020-12-10T16:14:19+5:30
atul bhatkhalkar : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, असा टोला जयंत पाटील यांना लगावला आहे.
पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे. पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपाचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, या विधानावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, असा टोला जयंत पाटील यांना लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांच्या विधानाच्या बातमीचे ट्विट करत निशाणा साधला आहे. "दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये. जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या... दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत..." असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
... तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2020
दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये.
जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या... दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत... pic.twitter.com/Mhqs6IhLyv
पुण्यात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची माहिती दिली. भाजपाला अलीकडेच हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपाकडून मिशन मुंबईचा नारा दिला गेला आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते. काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील. तसेच, पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपाचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले.