आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 07:07 PM2021-02-09T19:07:52+5:302021-02-09T19:10:18+5:30
आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होता
गेल्या अनेक दिवसांपासून नव्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांसह काही जणांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारी ट्वीट केली होती. त्याला प्रत्युत्तर देत हा देशाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत देशातील काही सेलिब्रिटींनीही ट्वीट केली होती. यानंतर काही जणांनी त्याचा विरोध केला. तर काही जणांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटला समर्थनही दिलं. दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत शरद पवार यांना टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यात शरद पवार हे आयसीसी चॅम्पिअनशीपची ट्रॉफी घेऊन मंचावर उभे आहेत. तसंच त्यांच्या पाठी ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडूही आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि अन्य खेळाडू यात शरद पवार यांच्यासह चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचं दिसत आहे. तसंच ट्रॉफी हाती दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांना बाजूला होण्यासही सांगितल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. "आपल्या क्षेत्राबाहेरील विषयात जास्त लुडबूड केली तर अशी ट्रिटमेंट मिळते," असंही ते म्हणाले.
आपल्या क्षेत्राबाहेरील विषयात जास्त लुडबूड केली तर अशी ट्रिटमेंट मिळते....
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 9, 2021
pic.twitter.com/FIAPgyFkvO
काय म्हणाले होते पवार?
"आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असं शरद पवार म्हणाले होते. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, त्यांनी नमूद केलं होतं.
नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यायला हवा. कदाचित त्यातुन मार्ग निघण्याची शक्यता आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असंही शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं.