".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:39 PM2021-02-04T20:39:21+5:302021-02-04T20:43:40+5:30
भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंना टोला
दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. विदेशातील काही लोकांनीही ट्वीट करुन या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. तर, देशातील विविध राजकीय पक्षाचे नेतेही सीमारेषेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची, शेतकरी नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. आता, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी गाझीपूर सीमेवर भेट दिली. मात्र, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण नक्की भारतातच राहतो का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय होता. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
"आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही. ते कायदे मोदी सरकारनं करून दाखवले. तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्त्याना भेटण्यासाठी जरूर जा. परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या," असं म्हणत भातखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर टीका केली.
आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही ते कायदे मोदी सरकारने करून दाखवले.तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाजीपुर बॉर्डरवर आंदोलनकर्त्याना भेटण्यासाठी जरूर जा परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या. @supriya_sulepic.twitter.com/DHl7UtHoif
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 4, 2021
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
गाझीपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश होता. काँग्रेस शिवाय जवळपास १० विरोधी पक्षाचे १५ पेक्षा अधिक नेते पोहचले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन प्रश्न विचारला होता.
गाझीपूर सीमेवर दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर सीमेचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला. आपल्या संस्कृतीत 'अन्नदाता सुखी भव' असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे, हे निषेधार्ह आहे, असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं होतं.