घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात; भाजपा नेत्याचा निशाणा
By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 12:49 PM2021-01-14T12:49:50+5:302021-01-14T12:52:40+5:30
भाजपा नेत्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा
अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी या अनुषंगाने त्यांची सुमारे दहा तास सखोल चौकशी करण्यात आली. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
"नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का," असं म्हणत भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.
नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 13, 2021
शनिवारी अटक केलेल्या सजनानी व अन्य दोन तरुणींकडून एनसीबीने सुमारे २०० किलो परदेशी गांजा जप्त केला आहे. करणच्या खात्यावर समीर खान यांच्याकडून ऑनलाइन २० हजार रुपये पाठविण्यात आले होते. त्यामुळे खार परिसरात राहत असलेल्या समीर यांना चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्याअनुषंगाने बेलार्ड पियार्ड येथील एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० वाजेपासून त्यांची चौकशी सुरू होती. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याला पैसे दिले होते, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, त्याबाबतचा सबळ पुरावा ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुमारे ८ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुच्छड पानवाला दुकानाचा सहमालक रामकुमार तिवारी याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.