"बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावानं बोटं मोडतायत"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 03:29 PM2021-02-26T15:29:29+5:302021-02-26T15:32:26+5:30
भाजप नेत्याची जोरदार टीका
गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यeधुनिक क्रिकेट स्टेडियमच्या नावावरून वाद सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या मोटेरा स्टेडिअमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नरेंद्र मोदी यांचं हे स्वप्न असून प्रत्यक्षात ते साकार झाल्यानं त्यांचं नाव स्टेडिअमला दिल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, अनेकांनी यावरून माजी पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी तुलना होत असल्याचा आरोपही केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.
"सरदार पटेलांशी पंतप्रधान मोदींची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. पण पटेलांप्रमाणे मोदींचा भारतातल्या नवं संस्थानिकांनी धसका घेतलाय हे खरे आहे. बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावाने बोटे मोडतायत," असं म्हणत भातखळकर यांनी जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला.
सरदार पटेलांशी पंतप्रधान मोदींची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. पण पटेलांप्रमाणे मोदींचा भारतातल्या नवं संस्थानिकांनी धसका घेतलाय हे खरे आहे. बापजाद्यांच्या पुण्याई वर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते. रोज मोदींच्या नावाने बोटे मोडतायत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 26, 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ज्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आलं त्या स्टेडियमला आधी सरदार पटेलांचे नाव देण्यात आले होते. मात्र, आता या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावानं म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यामुळेच काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधानांना निशाण्यावर घेतले आहे.
स्टेडियमला का दिलं नरेंद्र मोदींचं नाव?
काँग्रेस नेते याला सरदार पटेलांचा अपमान असल्याचे म्हणत आहेत, तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे, की "आम्ही या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना त्यांनी हे स्पप्न पाहिले होते. जे आता साकार झाले आहे. नवे स्टेडियमला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हायटेक स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. अहमदाबाद आता स्पोर्ट्स सिटीच्या नावानेही ओळखले जाईल."