... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 03:17 PM2021-02-17T15:17:56+5:302021-02-17T15:22:05+5:30
Rakesh Tikait : भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली होती.
"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही," अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली होती. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धारही भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या प्रभू श्रीरामावरील वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
"भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही ही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही. हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते," असं म्हणत भातखळकर यांनी टिकैत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टिकैत यांच्यावर टीका केली.
भाजपचे श्रीरामचंद्रांचे काहीही देणे घेणे नाही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही, हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते... pic.twitter.com/nuli6LJpDm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 17, 2021
काय म्हणाले होते टिकैत?
"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी महात्मा गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही आंदोलनजीवी करून टाकले आहे. ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर माफी मागायला हवी," अशी मागणी राकेश टिकैत यांनी यावेळी केली. "वास्तविक पाहता हनुमंतांचा लंकेशी काही वाद नव्हता. मात्र, प्रभू श्रीरामांना मदत करण्यासाठी ते लंकेत गेले. भाजपवाल्यांचा श्रीरामांशी काही संबंध नाही. त्यांना श्रीरामचंद्रांशी काही घेणे देणे नाही," असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला.
पश्चिम बंगालमध्ये किसान पंचायत
"केंद्रीय कृषी कायद्यामुळे सामान्य जनता नाही, तर पशूंचाही भूकबळी जाईल. पश्चिम बंगालमधील शेतकरी दुःखी आहेत. त्यांना त्यांच्या पीकाची योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे तेथेही किसान पंचायतीचे आयोजन केले जाईल," असं राकेश टिकैत यांनी जाहीर केलं. शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मतं देऊ नका, असं आवाहन करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.