"संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 03:24 PM2021-02-22T15:24:38+5:302021-02-22T15:29:15+5:30
सामना संपादकीयतील राम मंदिरावरील मुद्द्यावरुन भाजप नेत्याचा राऊतांना टोला
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. वाढत्या दरवाढीवरून शिवसेनेनं मोदी सरकारसह भाजपवरही टीकेचे बाण सोडले आहेत. राममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील, असं म्हणत सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेनं केंद्रावर निशाणा साधला होता. यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
"संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असलाच तर तो टक्केवारीशी आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून राम मंदिराचा चंदा आठवला. काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण मात्र लागलाय. पेट्रोल-डिझेलच्या दरात २६ रूपयांचा वॅट राज्य सरकारचा आहे. तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका. मग त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करा," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.
मोदी जो कर जमा करतायत त्याचा ४१ टक्के तुम्हाला मिळतोय. त्यामुळे लोकांना विनाकारण भडकवायचं आणि खोटं बोलायचं हे उद्योग आता संजय राऊत यांनी बंद करावेत, असंही ते म्हणाले.
सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2021
पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला 26 टक्के VAT तर कमी करा. pic.twitter.com/XDpAxaJhli
काय म्हटलंय अग्रलेखात?
लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली होती.