महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय...; भाजपा नेत्याचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:39 AM2021-01-28T11:39:39+5:302021-01-28T11:44:01+5:30
शेतकरी आंदोलनात भाजपचा एक शिरल्याचा राऊत यांनी केला होता आरोप.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर काही आंदोलकांनी लाल किल्ल्यातही प्रवेश करत मोडतोड केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होता. दरम्यान, यावर शिवसेनेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज एक प्रतिक्रिया दिली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान भाजपाचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झालं, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला होता. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
दरम्यान, भातखळकर यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. "महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेवरही जोरदार टीका केली. एका वृत्ताचा हवाला देत "मुंबईतील ५०० चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता करात १०० टक्के माफी देण्याची घोषणा हवेतच विरली आणि नेहमीप्रमाणे यु टर्न घेऊन सत्ताधारी शिवसेनेने सर्व साधारण दहा टक्के सवलतीची पाने मुंबईकरांच्या तोंडाला पुसली," असं म्हणत त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवरही जोरदार टीका केली.
काय म्हणाले होते राऊत?
"सरकारनं एकप्रकारे दडपशाही सुरू केली आहे. लाल किल्ल्यावर जे घुसले ते खरोखरंच शेतकरी होते का असा प्रश्न निर्माण होत आहे. लाल किल्ल्यावर काही जणांना फुस लावून पाठवण्यात आलं होतं. ते आता कुठे फरार झाले, गायब झाले याचा तपास करावा. जे आता फोटो समोर येत आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत आहेत. सिद्धू वगैरे हे लोक कोण आणि कोणाचे आहेत याचा तपास करावा. सरकारला शेतकऱ्यांना चिरडून दडपशाही करायची आहे. त्याच कारस्थानाचा एक भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडू त्यातील एक गट भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलनात घुसला होता," असा आरोप राऊत यांनी केला होता.