रात्री कोणाला अटक झाली तर...; चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 08:38 AM2021-07-17T08:38:37+5:302021-07-17T08:42:24+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
नाशिक: महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, केंद्रीय तपास यंत्रणांमुळे नेते अडचणीत आले असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अनौपचारिक गप्पा मारत असताना पाटील यांनी केलेल्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाटील यांना नेमकं काय सुचवायचं आहे, असा प्रश्न त्यांचं वक्तव्य ऐकून अनेकांना पडला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाशिकमध्ये आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. पत्रकार परिषद संपल्यानंतर पाटील तिथून निघाले. त्यावेळी त्यांच्या आसपास भाजपचे पदाधिकारी होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्या मुक्कामाबद्दल प्रश्न केला. त्यावर त्यांनी 'मी इथेच आहे. काय माहीत, रात्रीच कोणाला अटक झाली तर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागेल ना', असं विधान केलं.
अनिल देशमुखांची ४.२० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची कारवाई
चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. पाटील नेमकं काय सुचवू पाहत आहेत, त्यांनी कोणाच्या अटकेबद्दल विधान केलं आहे, अशी चर्चा त्यानंतर रंगली. सध्या महाविकास आघाडीतले नेते आणि आमदार केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांचं विधान अतिशय सूचक आणि महत्त्वाचं मानलं जात आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. यामुळे देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील १ कोटी ५४ लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील २५ प्लॉट्सचा समावेश आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर सचिन वाझेला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात आरोप आहेत. त्यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई सध्या ईडीच्या अटकेत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचे आरोप आहेत. सरनाईक यांच्या घरावर, कार्यालयांवर आणि मालमत्तांवर ईडीनं छापे टाकले आहेत. त्यानंतर सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्रदेखील लिहिलं होतं. 'केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे भाजपशी जुळवून घ्या,' अशी मागणी त्यांनी पत्रातून केली होती.