'तो' एक शब्द ठरतोय भाजप-मनसे युतीतला अडथळा? चंद्रकांत पाटील पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:33 AM2021-08-06T11:33:47+5:302021-08-06T11:59:14+5:30
शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या भिडूच्या शोधात; मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेनं पुन्हा जोर धरला आहे. याआधी राज आणि पाटील यांची पुण्यात बैठक झाली होती. त्यावेळी पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेचा मुद्दा राज यांच्याकडे उपस्थित केला होता. त्यावर माझ्या भूमिका स्पष्टच असतात, असं राज यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.
उद्या राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतची भूमिका यासंदर्भात मी चर्चा करण्यासाठी त्यांना भेटणार आहे. सध्या युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, मी एकटा निर्णय करणारा नाही. आमच्याकडे तीन निर्णयकर्ते आहेत, असं पाटील म्हणाले होते.
भाजपला राज ठाकरेंकडून 'व्यापक' भूमिकेची अपेक्षा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे. उद्याच्या भेटीच विचारांचे आदान-प्रदान होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज यांनी 'व्यापक' भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे राज भाजपला अपेक्षित असलेली 'व्यापक' भूमिका घेणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
आधी काय घडलं?
माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, ही भेट होत आहे. मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू, असं पाटील यांनी सांगितलं.