लिमलेटची गोळी अन् चॉकलेटचा वादा; जेव्हा एकमेकांना पत्र लिहितात नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 03:47 PM2020-10-25T15:47:28+5:302020-10-25T15:49:07+5:30

नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा एकमेकांना पत्रं लिहितात तेव्हा...

bjp leader chandrakant patil writes to eknath khadse after he joins ncp | लिमलेटची गोळी अन् चॉकलेटचा वादा; जेव्हा एकमेकांना पत्र लिहितात नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा

लिमलेटची गोळी अन् चॉकलेटचा वादा; जेव्हा एकमेकांना पत्र लिहितात नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा

Next

- अभय नरहर जोशी

आदरणीय भाऊ,

...शेवटी तुम्ही आमचं ऐकलं नाहीतच ना. गेला ना सोडून आम्हाला. विजयादशमीच्या आधीच सीमोल्लंघन करून गेलात. फार बुवा हट्टी तुम्ही. आम्ही तुम्हाला सतत ‘लॉलीपॉप’ दाखवून रोखलं होतं. (नंतर तेही दाखवणं बंद केलं.) पण तुम्ही घर सोडून गेलात. आता तिकडे तुम्हाला ‘लिमलेटची गोळी’ मिळेल की ‘कॅडबरी चॉकलेट’ हे लवकरच समजेल. काल तर काहीच मिळालं नाही. घड्याळाचं नवीन चित्र मिळालं फक्त. तुम्हाला काय द्यायचं, या संभ्रमात ‘घड्याळ’वाल्यांनी दुपारचा कार्यक्रम संध्याकाळवर ढकलला. आपल्या घरी तुमचे कुठलेच हट्ट अलीकडे पुरवले जात नव्हते, (खरंतर आम्ही ठरवूनच तुमचे लाड पुरवत नव्हतो. तशी तंबीच होती वडीलधाºयांकडून) फक्त आमच्यावर रुसून ज्यांच्या घरी गेला आहात, त्यांच्यापासून जपून राहा. तेथे तुमचे भलते हट्ट करू नका. आधीच त्या घरांमध्ये महाहट्टी महाभाग आहेत. त्या घराचा कारभारी भलता खट आहे. या सगळ्यांना पुरून उरला आहे. तुम्हालाही तो दाखवेल चॉकलेटचं आमिष अन् लिमलेटची गोळीही देणार नाही. वर तुमच्या हातात 'बुढ्ढे के बाल' देईल. दिसायला हा पदार्थ वरवर फार मोठा नि रंगीत दिसतो. खायला गेलो तर जिभेवर काहीच उरत नाही. पटकन विरघळून जातो. नुसतंच काहीतरी गोड खाल्ल्याचा भास होतो. भूक काही भागत नाही. खरं तर तुम्ही 'नाना फडणवीस यांचे बारभाई राजकारण' हा ग्रंथ लिहायला घेण्याचा संकल्प जाहीर केला होता. अहो आपल्याकडे... म्हणजे आता आमच्याकडे... 'मोटा भाई' आणि 'छोटा भाई' या दोनच गुजराती भाईंचे चालते. तुम्हाला कोण 'बारा भाई' दिसले ठाऊक नाही. उलट तुम्ही स्वत:च बारामतीकरांकडे जाल व बारा'मती' गुंग करणाऱ्या त्यांच्या खेळात सामील व्हाल, असं वाटलंच नव्हतं. तिथं आधीच बारा भाई  चॉकलेटं बळकावून बसलेत. या धबडग्यात तुम्हाला 'लिमलेट'ची गोळी मिळाली अन् ती कितीही आंबट लागली तरी गोड मानून घ्या. 'कॅडबरी' मिळाली तरी जपून खा, कपड्याला ती लागली तर त्याचे ‘डाग’ लवकर जात नाहीत. मागच्या वेळचे ‘डाग’ अजून धुतले जात नाहीयेत, तरी काळजी घ्या आणि आता तरी गेल्या घरी सुखी रहा. 

(पूर्वीचा) आपला 
पुणेकर (व्हाया कोल्हापूर) दादा

ता. क. : आपली आप्त अजूनही आमच्याच घरात आहेत, काळजी नको. त्यांची 'रक्षा' करू... म्हणजे सुरक्षित ठेवू. 

------------------

पुणेकर दादांस, 

मागच्या पुरात तुम्ही कोल्हापूर सोडून पुण्याला गेलात. निर्वासित पाहुणे म्हणून गेलात अन् तेथील ताईंच्या घरातच ठिय्या मारून ताईंनाच निर्वासित केलंत. पाहुण्यांच्या अशा वागण्यानंच पुणेकर फार पाहुणचार करत नाहीत. यंदा कोल्हापूरला पूर आला नाही तरी तिकडे फिरकलाच नाहीत. अहो तुम्ही ‘वडीलधाऱ्यांचे लाडके’ म्हणून तुम्हाला आयतं चॉकलेट, कुल्फी देऊन तुमचे लाड पुरवले नि मला अ'नाथ' केलं. मला ‘लिमलेटची गोळी’ मिळेल की ‘चॉकलेट’, याची तुम्हाला लै उत्सुकता. अहो 'लिमलेटची गोळी' जरी मिळाली तरी लागलेली 'तहान' त्याने थांबते. ती जशी आंबट असते तशी गोडही असते. तुमच्याकडे तीही मिळाली नाही. जे ‘च्युईंग गम’ मिळाले होते, त्यातील गोडवा संपल्यानंतर ते नुसतेच चघळत बसावे लागले. आपल्या घरात झालेली खिचडी पाहून उबग आला हो. त्यापेक्षा 'मना गाव, मना देस'ची खान्देशी खिचडी खूप चांगली. मुक्ताईदेवीची शपथ, तापीचं पाणी प्यायलोय. आता पहा माझ्या खानदेशात खिचडीच काय, त्याबरोबरच्या पापडाएवढेही तुम्हाला ठेवत नाही. पापडासारखाच मोडून खातो की नाय बघाच. तुम्ही 'ईडी' पीडा लावलीच तर सीडी लावून तुमच्या घरासमोर येऊन ‘खडसा’वेन. ‘नाना फडणवीसांच्या बाराभाईंच्या राजकारणा’वर ग्रंथ लिहिणार आहेच. माझ्या ‘नव्या जाणत्या साहेबां’कडून नवीन दस्तावेज मिळाले तर त्याचाही अंतर्भाव त्यात करेनच. माझ्याबाबतीत ‘निगेटिव्ह’च असणारे ‘मा. मु.’ नुकतेच ‘कोविड पॉझिटिव्ह’ झाल्याने त्यांचं क्वारंटाइन संपल्यावर त्यांच्यासाठी नवे ‘डोस’ देईनच. माझे ‘डाग’ धुण्याची चिंता करू नका. त्यासाठी मी ‘घडी’ पावडर वापरणार आहे. सगळे डाग जाण्यास मदत होईल. तुमच्या घरातील माझी आप्त स्वत:ची ‘रक्षा’ करण्यास समर्थ आहे. आपण काहीही करू नये. दादा, मला तुमच्यापेक्षा आमच्या नव्या घरातील ‘दादां’चीच जास्त धास्ती आहे. त्यांचे माझ्याशी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ शारीरिक की मानसिक हे लवकरच समजेल. असो. 

आपला (उपेक्षित) 
मुक्ताईनगरकर भाऊ

ता. क. : या वेळी माझ्या पत्रातील शुद्धलेखनाच्या चुका दाखवू नका. तुमच्या चुकांपुढे त्या क्षुल्लक आहेत.

Web Title: bjp leader chandrakant patil writes to eknath khadse after he joins ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.